Poonam Mahajan

Member of Parliament,North-Central Mumbai

National President-BJYM

poonam Mahajan

Poonam Mahajan

Member of Parliament,North-Central Mumbai

National President-BJYM

रशिया आणि पुतीन यांचे अद्वैत

जगातील रशिया या बलाढ्य राष्ट्राकडे नेहमीच कुतूहलाने पाहिले जाते. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाले आणि कित्येक नवीन देश जगाच्या पटलावर आले. पण, त्याचा दीर्घकालीन प्रभाव रशियाच्या विकासधोरणांवर जाणवला नाही. मागील दोन दशकांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष तसेच पंतप्रधान राहिलेल्या व्लादिमीर पुतीन यांनी रशियाला सर्वच क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तेव्हा, या रशियाचा पूर्वेतिहास, पुतीन यांची गाजलेली कारकीर्द, लोकप्रियता, एकूणच रशिया आणि पुतीन यांचे अद्वैत आणि पर्यटनस्नेही रशियाचे अनुभवांवर आधारित चित्रण करणारा हा लेख...

रशिया... जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राष्ट्र. आर्थिक महासत्ता. जगातील अन्य महासत्तांना सक्षमपणे टक्कर देणारं बलाढ्य राष्ट्र. असं म्हटलं जातं की, जितका देदीप्यमान इतिहास तितके समृद्ध आणि बलाढ्य राष्ट्र. रशिया याला अपवाद कसा असेल? निग्रही राजेशाही, राष्ट्राभिमानी जनता, मार्क्सवादाचे प्रणेते यापासून निर्दयी राजे, क्रूर हुकूमशहा, सततची परकीय आक्रमणे या सर्वांतून तावूनसुलाखून निघालेला रशिया दिमाखाने जगात मानाच्या स्थानावर विराजमान आहे. सहा महिन्यांपूर्वी रशियात गेले असताना हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. चांगल्या-वाईट इतिहासाच्या खुणा अभिमानाने जतन केल्या आहेत रशियामध्ये. मग तो झारचा राजवाडा असो, नेपोलियनच्या हिटलरच्या आक्रमणांचे कटू अवशेष असोत किंवा कम्युनिस्ट राजवटीची चांगली-वाईट स्मारके. नेपोलियनचा केलेल्या पराभवाबद्दल प्रत्येक रशियन माणसाच्या मनात आजही असलेला अभिमान स्पष्टपणे पाहायला मिळतो. रशियाचा इतिहास पाहायचा तर तो जातो आठव्या शतकात. स्लाव्ह आणि फिनिश वंशाच्या टोळ्यांनी इ. सन ८८२ मध्ये किएव्हन रशिया प्रांतामध्ये राज्य निर्माण केले. नवव्या शतकाच्या अंतास या राज्यात ‘व्लादिमीर द ग्रेट’च्या पुढाकाराने ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्म स्वीकारला गेला. साधारण तीन शतके राज्य केल्यानंतर मंगोल टोळ्यांच्या हल्ल्यात निम्मी लोकसंख्या मारली गेली आणि ही राजवट लयास गेली. तेराव्या शतकाच्या मध्यास राजपुत्र अलेक्झांडर नेव्स्की याने रशियावर हल्ले करणारे स्वीडिश आणि रोमन यांना पिटाळून लावायला सुरुवात केली आणि रशियाच्या समृद्ध राजवटींचा श्रीगणेशा केला. त्याचा सर्वात लहान मुलगा डॅनिअल अलेक्सान्ड्रोवीच याने नदी आणि संरक्षक जंगले यांनी वेढलेल्या मॉस्को शहराची स्थापना केली. मंगोल टोळ्यांनी त्याला ‘मॉस्कोचा राजपुत्र’ म्हणून मान्यता दिली. हळूहळू मंगोल टोळ्या क्षीण होत गेल्या आणि रशियात झारशाहीची स्थापना झाली. ‘इवान द ग्रेट’ आणि ‘इवान द टेरिबल’यांच्या राजवटीनंतर सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोलिश लोकांना पराभूत करून रशियात मायकेल रोमानोव्ह याची राजा म्हणून निवड केली गेली आणि या रोमानोव्ह घराण्याने १९१७ सालापर्यंत रशियावर निरंकुश राज्य केले. पूर्व आणि पश्चिमेकडील विविध राज्ये जिंकत रशिया वाढवला जात होता. जगातील सर्वात मोठे राष्ट्र म्हणून रशिया ओळखला जाऊ लागला.

सतराव्या शतकात ‘झार पीटर द ग्रेट’ याने रशियाला युरोपियन समुदायात सामील करवून घेतले. आपल्याकडे आपण जसे छत्रपती शिवाजी महाराजांना पूज्य मानतो, त्याच धर्तीवर रशियात ‘पीटर द ग्रेट’ला पूजले जाते. पश्चिमी राष्ट्रांच्या धर्तीवर रशियामध्ये बदल घडवून आणण्यात ‘पीटर द ग्रेट’ने सुरुवात केली. रशियात दोनशे वर्षे असलेली झारशाही संपवून ‘पीटर द ग्रेट’ने स्वतःला सम्राट घोषित केले. स्वतःसाठी सेंट पीटर्सबर्ग शहर त्याने वसविले. सरकारी कामकाजात आमूलाग्र बदल घडवत त्याने विषयानुसार खाती आणि या खात्यांसाठी कार्यालयांची उभारणी केली. तुर्कस्थान, स्वीडन या राष्ट्रांशी युद्धे जिंकत त्याने रशियात आणि शेजारील राष्ट्रांत शांतता आणि सौहार्दमय वातावरण निर्माण केले. अगदी छोट्या मुलापासून सगळे रशियन लोक आजही अभिमानाने ही माहिती देताना थकत नाहीत. ‘पीटर द ग्रेट’ नंतर ४० वर्षे उलटल्यावर गादीवर बसलेला अकार्यक्षम राजा पीटर तिसरा याच्या गूढ मृत्यूनंतर रशियामधील पुढची ३४ वर्षे चाललेल्या सर्वात महत्त्वाकांक्षी राजवटीला प्रारंभ झाला, त्याची पत्नी ‘कॅथेरिन द ग्रेट’च्या रूपाने. मूळची जर्मन राजकन्या असलेल्या कॅथेरिनने अकार्यक्षम पीटर(तिसरा) च्या अकाली संशयास्पद मृत्यूनंतर रशियाच्या राज्याची सूत्रे स्वतःकडे घेतली. ‘पीटर द ग्रेट’ ला आदर्श मानून त्यांच्याप्रमाणेच रशियावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत रशियामध्ये कला, विज्ञान आणि शिक्षणाला चालना देण्यास तिने सुरुवात केली.अत्यंत कुशलतेने आंतरराष्ट्रीय धोरणांची हाताळणी करत तिने रशियन साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. रशियातील उमरावांविरुद्ध कोसॅक टोळ्यांनी पुकारलेले बंड कॅथेरिन राणीने कुशलपणे हाताळून हाणून पाडले. क्षीण होत असलेल्या ऑटोमन साम्राज्याविरोधात युद्ध पुकारत राणीने रशियाची सीमा दक्षिणेस काळ्या समुद्रापर्यंत वाढवली. ‘कॅथेरिन द ग्रेट’ने केवळ महत्त्वाकांक्षी इच्छाशक्तीवर रशियाचे साम्राज्य चहुबाजूंना वाढवले आणि जागतिक पातळीवर रशियाची गणना एक बलाढ्य साम्राज्य म्हणून करण्यास भाग पाडले.

रशियात फिरताना जाणवलेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रशियन माणसाला भारत आणि भारतीयांविषयी असलेली अतोनात आस्था. पाहायला गेलं तर जपान, रशियासारखे देश झापडबंद बंदिस्त समाज समजले जातात. पण, मला तरी या देशांत राज कपूर यांच्या ‘आवारा’ चित्रपटातील गाणी रशियन माणूस सर्रास गाताना दिसतो. मिथुन चक्रवर्तीच्या नृत्यांवर थिरकताना दिसतो. भारतातील वाहिन्यांचे कार्यक्रम येथे रशियन भाषेत डब करून दाखवले जातात.

अठराव्या शतकात सगळीकडे अजिंक्य ठरलेला फ्रान्सचा सम्राट नेपोलियन याचा पराभव करत झार अलेक्झांडर पहिला याने पुन्हा एकदा रशियाच्या सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली. यानंतर मात्र रशियातील गरीब आणि अतिश्रीमंत यांच्यातील दरी रुंदावत होती. जगात गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठत असताना १८६१ साली तत्कालीन सम्राट अलेक्झांडर दुसरा याने रशियामध्ये रूढ असलेले ‘सर्फडम’ संपुष्टात आणण्यासाठी करार केला.यानंतर चार वर्षांनी अमेरिकेमध्ये गुलामगिरी संपुष्टात आणण्यासंदर्भात करार केला गेला. या काळातच मार्क्सवाद मोठ्या प्रमाणावर फैलावत होता आणि याचीच परिणती जगप्रसिद्ध बोल्शेव्हिक क्रांतीमध्ये झाली. पहिल्या महायुद्धानंतर क्षीण झालेला रशियन साम्राज्यवाद, धर्मगुरू रासपुतीनसारख्याचे धार्मिक अत्याचार यांनी त्रस्त झालेल्या रशियातील कामगारवर्गाने लेनिन आणि अन्य कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्वामध्ये रशियातील झारशाही उलथून टाकली. या चळवळीबद्दल रशियात सांगितले जाते की, कामगारवर्गाची ही चळवळ आणि त्यांच्या मनातील राजेशाहीबद्दलचा राग इतका तीव्र होता की, चळवळीतले क्रांतिकारक तेव्हा गादीवर असलेला राजा निकोलस दुसरा याला केवळ पदच्युत करून थांबले नाहीत, तर राजेशाही पुन्हा कधीही रशियात उदयास येऊ नये यासाठी त्यांनी निकोलस आणि त्याची सगळी मुले यांची एका खोलीत कोंडून जाळून हत्या केली. याचबरोबर राजेशाहीचा अस्त होऊन रशियात कम्युनिस्ट राजवट सुरू झाली. लेनिन, स्टॅलिन, क्रुश्चेव्ह, ब्रेजनेव यांच्यासारख्या कडव्या कम्युनिस्ट नेत्यांनी रशियन संघराज्य १९९१ पर्यंत सांभाळले. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या जर्मनीला पराभूत करण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या रशियाने पुढील काळात जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेशी तोडीस तोड टक्कर देत कम्युनिझम जगात वाढवले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात कम्युनिस्ट रशिया आणि उदारमतवादी अमेरिका या दोन महासत्तांमध्ये जगप्रसिद्ध शीतयुद्ध सुरू होते. १९७०च्या मध्यापर्यंत सुरू असलेले हे राजकीय डावपेचांचे युद्ध हे दोन देश महायुद्धात पराभूत झालेल्या दुभंगलेल्या पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या भूमीवरून खेळत होते. १९९० मध्ये राष्ट्राभिमानी जर्मन जनतेने निकराचा निर्णय घेत कुप्रसिद्ध बर्लिनची भिंत पाडत जर्मनीचे एकीकरण घडवून आणले आणि याचा ‘डॉमिनो इफेक्ट’ पूर्व युरोपात दिसू लागला. युगोस्लाव्हिया, रूमानिया, झेकोस्लोव्हाकिया ही कम्युनिस्ट राष्ट्रे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. याच बदलाचे वारे वाहू लागलेल्या रशियात चेअरमन गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोइका’ आणि ‘ग्लासनोस्त’ची घोषणा केली आणि थोड्याच काळात रशियन संघराज्याचे विघटन झाले. युक्रेन, जॉर्जियासारखी संपन्न राज्ये युएसएसआरमधून फुटून वेगळे देश म्हणून उदयास आली.

त्यानंतर जवळपास १०-१२ वर्षे खिळखिळ्या बनलेल्या रशियामध्ये नव्वदच्या दशकात एक नवीन नेता उदयाला येत होता. केजीबीमध्ये राहिलेले, नंतर रशियन फेडरेशनचे पहिले उपपंतप्रधान झालेले व्लादिमीर व्लादीमिरोवीच पुतीन १९९९ मध्ये पंतप्रधान झाले आणि २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले. कम्युनिस्ट राजवटीत असलेली परराष्ट्रीय धोरणे, विदेशी गुंतवणुकीत असलेल्या मर्यादा या सर्वच गोष्टींवर मात करायचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. १९५२ साली तत्कालीन लेनिनग्राड म्हणजेच मूळचे आणि आजचे सेंट पीटर्सबर्ग येथे जन्मलेले व्लादिमीर पुतीन कायद्याचे पदवीधर आहेत. अस्खलित जर्मन बोलता येणारे, अत्यंत शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेले आणि प्रखर राष्ट्राभिमानी पुतीन ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्टधारक आहेत. सोव्हिएत रशियातील शैक्षणिक नियमानुसार १९७० ते १९९१ कम्युनिस्ट पार्टी ऑफ रशियाचे सदस्य राहिलेल्या पुतीन यांनी सोव्हिएत संघराज्याच्या विघटनानंतर कम्युनिझमची संभावना‘सभ्यतेच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेली एक अंधारी गल्ली’ अशी केली होती. १९७५ ते १९९१ या कालावधीत केजीबीमध्ये काम करणाऱ्या पुतीन यांनी १९९० मध्ये जर्मन एकीकरणाच्या वेळी केजीबीच्या ताब्यातील रशियासाठी अत्यंत संवेदनशील ठरू शकणारी अनेक कागदपत्रे जाळून टाकली होती, असे सांगितले जाते. १९९९ मध्ये तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी व्लादिमीर पुतीन यांची तीन उपपंतप्रधानांपैकी एका जागेवर नेमणूक केली आणि त्यावेळी त्यांचे उत्तराधिकारी पुतीन असावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. नवीन सहस्रकाच्या मध्यरात्री घडलेल्या अनपेक्षित घडामोडींमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पदत्याग केला आणि व्लादिमीर पुतीन रशियन फेडरेशनच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाले. या वर्षात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. परंतु, सत्तेचा आणि प्रसंगी बळाचा वापर करून या सगळ्या आरोपांना थंड करण्यात पुतीन यशस्वी झाले, हे सगळ्या जगाने पाहिले. २००० साली झालेल्या निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवत पुतीन पूर्णवेळ राष्ट्राध्यक्ष बनले आणि पहिल्या चार वर्षांत त्यांनी रशियातील अंतर्गत कलह साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून जवळपास आटोक्यात आणले. याच काळात रशियामधील गरिबीची स्थिती बदलण्यासाठी आमूलाग्र बदलांची सुरुवात करतानाच पुतीन यांनी तेथील प्रमुख व्यावसायिकांचीदेखील मने जिंकून घेतली. चेचेन प्रांतात सैन्य घुसवून तेथील बंड देखील शमविण्यासाठी प्रसंगी निर्दयी होण्यात पुतीन यांनी मागेपुढे पाहिले नाही.

व्यावसायिक आणि कामगारवर्ग या दोघांचीही मने पहिल्या चार वर्षांत जिंकून घेतल्याने पुढच्या निवडणुकीमध्ये पुतीन तब्बल ७१ टक्के मते मिळवून निवडून आले. कम्युनिस्ट राजवट गेल्यानंतरच्या काळात रशियाची अवस्था सर्वच आघाड्यांवर बिकट झाली होती. याची संपूर्ण जाणीव असल्याने पुतीन यांनी मुख्यत्वे आरोग्य, शेती, शिक्षण आणि लोकांसाठी घरे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. याच काळात रशियातील भ्रष्टाचाराविरोधात तेथील काही प्रथितयश पत्रकारांनी, कारभारावर नाराजी असलेल्या कलाकारांनी, खेळाडूंनी आघाडी उघडली होती. मात्र, या सर्वांचीही सर्वप्रकारे मुस्कटदाबी करण्यात पुतीन यशस्वी झाल्याचे रशियात दिसून आले. यानंतर पुतीन यांनी २००७च्या शेवटी सरकार बरखास्त केले. त्यांची लोकप्रियता मात्र वाढतच होती. ६४ टक्के रशियाने पुन्हा पुतीन यांनाच कौल देऊन हे सिद्ध केले, पण रशियाच्या घटनेनुसार सलग तिसऱ्या वेळी राष्ट्राध्यक्ष होता येत नसल्याने पुतीन यावेळी पंतप्रधान झाले. जागतिक मंदीच्या काळातही रशियाची आर्थिक स्थिती सांभाळण्यास पुतीन यांची उदारमतवादी धोरणे यशस्वी ठरत होती. रशियाला गतवैभव प्राप्त करून देत पुन्हा एकदा महासत्ता बनविण्याचा पुतीन यांनी आता चंगच बांधला होता. वेळप्रसंगी युरोपीय देशाची धोरणे, २०१२ मध्ये तिसऱ्या वेळी राष्ट्राध्यक्ष झालेले पुतीन प्रसंगी कम्युनिस्ट काळातील धोरणे, कधी उदारमतवादी धोरणे तर कधी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे निर्दयीपणे आता रशियाचा राज्यकारभार करत होते. परराष्ट्र धोरणात आपल्याला हवे तसे बदल करत सीरियामधील बंड मोडण्यासाठी रशियन सैन्य पाठविणे असो, युक्रेनमधील फुटीरतावाद्यांविरोधात उघडलेल्या आघाडीला समर्थन देणे असो, पुतीन लीलया निर्णय घेत होते आणि जगाला गोंधळात टाकत होते. आज रशियात फिरताना कम्युनिस्ट रशियाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसतो. मॉस्को, सेंट पीटर्सबर्गसारख्या मोठ्या शहरांतील कम्युनिस्ट राजवटीच्या खुणा समूळ नष्ट केल्या जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात की, खास कम्युनिस्ट छाप असलेल्या जुन्या इमारती बदलल्या गेल्या आहेत. त्यांना पाश्चिमात्त्य रूप दिले जात आहे. मॉस्कोच्या रस्त्यावरून फिरताना हा फरक सहज समजून येतो. २०१६ मध्ये मॉस्कोच्या मध्यभागी उभारला गेलेला ‘व्लादिमीर द ग्रेट’चा १५ मीटर उंचीचा पुतळा रशियाच्या गतवैभवाची साक्ष देतो. सर्रास इंग्रजी ही जागतिक भाषा बोलणारे रशियन लोक पाहिले की, वाटतच नाही की, या ठिकाणी पूर्वी अन्य भाषांत बोलणे हा जणू गुन्हा समजला जाई. जगातले सगळे लोकप्रिय ब्रॅण्ड्स आज रशियात विकले जातात. रशियामधले लोकप्रिय ब्रॅण्ड्सही आज जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.

शिक्षणाच्या संधी, सर्व क्षेत्रांतील नोकऱ्या, संशोधनासाठी संधी, कलागुणांना वाव देणे इत्यादी आघाड्यांवर मुबलक संधी पुतीन यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत, हे येथील तरुण एकमुखाने सांगतात. रशियातील कटू घटना विसरून गेल्या १० शतकांचा देदीप्यमान प्रवास नवी पिढी उघडपणे, अभिमानाने आणि प्रेमाने सांगताना दिसते. पुतीन यांच्या एकाधिकारशाहीची संपूर्ण जाणीव असूनही तेच जिंकणार आणि रशियाला शांत आणि समृद्ध ठेवणार, याबद्दल येथील युवकांच्या मनातील ठाम विश्वास दिसून येतो.

विदेश धोरण ठरवताना केवळ पश्चिमी जगताला प्राधान्य न देता पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांच्या संदर्भातील धोरणाबाबत पुतीन यांनी योग्य मेळ राखून जगभरात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत जुन्या कम्युनिस्ट कट्टरवादी रशियाचा चेहरामोहरा बदलून टाकला. तेलावर महसूल लावून त्यातून रशियावर असलेले परकीय कर्ज पुतीन यांनी फेडून टाकले आणि २०१२ मध्ये जागतिक व्यापारी संघटनेमध्येही रशियाला सामील करून घेतले. याचबरोबर सहजसोपी करप्रणाली, परदेशी गंगाजळीचा योग्य अपव्यय या सगळ्यामुळे रशियाचा जीडीपी पुन्हा एकदा दिमाखात वाढू लागला. सैन्य, धार्मिक धोरणे, मानवाधिकार धोरणे, क्रीडाविषयक धोरणे, शेती, आण्विक कार्यक्रम या सगळ्याच धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करून त्यांनी रशियात जणू एक आधुनिक क्रांतीच घडवून आणली. एकेकाळी अमेरिकेचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जाणारा रशिया आज वेळप्रसंगी अमेरिकेच्या हातात हात घालून जागतिक स्तरावरील निर्णयप्रक्रियेमध्ये सहभागी होतो. टोळ्यांचे हल्ले, राजेशाह्या, कम्युनिस्ट राजवटी सहन केलेला रशिया आता एक विकसनशील स्वायत्त लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून गणला जाऊ लागला आहे, याचे श्रेय केवळ पुतीन यांनाच द्यावे लागेल. रशियात फिरताना एक मात्र प्रकर्षाने जाणवलं की,रोमानोव्ह घराणे आणि त्यानंतर थेट पुतीन एवढंच इथले सर्वसामान्य लोक बोलतात. कम्युनिस्ट राजवट येथील लोकांनी जणू विस्मरणाच्या कप्प्यात बंद करून टाकली आहे. आपल्या क्रांतिकारी आश्चर्याचे धक्के देणाऱ्या निर्णयक्षमतेमुळे आज जिवंतपणीच व्लादिमीर पुतीन एक दंतकथा बनले आहेत. परवाचा राजेशाही रशिया, कालचा कम्युनिस्ट रशिया आणि आजचा पुतीन यांचा रशिया लोकशाहीवादी की पुतीनवादी? रशिया हा या देशाचा प्रवासही एखाद्या दंतकथेसारखाच म्हणावा लागेल.

आजच्या काळात तसं पाहायला गेलं तर हुकूमशाही कारभार करणाऱ्या नेत्याची इतकी वर्षे तुफान लोकप्रियता कशी काय असू शकते, याचा शोध घ्यायचा रशियात प्रयत्न केला, त्यावेळी हे स्पष्टपणे दिसून आलं की, केवळ देशाचा विचार करूनच आपण जे काही करतो आहोत, ते रशियन जनतेच्या मनावर बिंबवण्यात पुतीन संपूर्णपणे यशस्वी झाले आहेत. १२-१३ वर्षांच्या लहान मुलांपासून ९० वर्षांच्या वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात समृद्ध बलशाली रशियाचे स्वप्न पुतीन यांनी यशस्वीपणे कोरलेले जाणवून येते. तेथील तरुण मान्य करतात की, रशियात बरेच जाचक निर्बंध आहेत. पत्रकार आणि पुतीन यांना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करणारे यांची तर जाणवेल इतक्या प्रमाणात मुस्कटदाबी केली जाते. परंतु, तरुणांना मात्र रशियाचा उज्ज्वल भविष्यकाळ पुतीन यांच्या दूरगामी नेतृत्वात दिसतो आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बनविलेल्या नियमांमधून पुतीन यांनी रशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींनाही वगळलेले नाही, हे इथले तरुण अभिमानाने सांगायला विसरत नाहीत. शिक्षणाच्या संधी, सर्व क्षेत्रांतील नोकऱ्या, संशोधनासाठी संधी, कलागुणांना वाव देणे इत्यादी आघाड्यांवर मुबलक संधी पुतीन यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत, हे येथील तरुण एकमुखाने सांगतात. रशियातील कटू घटना विसरून गेल्या १० शतकांचा देदीप्यमान प्रवास नवी पिढी उघडपणे, अभिमानाने आणि प्रेमाने सांगताना दिसते. पुतीन यांच्या एकाधिकारशाहीची संपूर्ण जाणीव असूनही तेच जिंकणार आणि रशियाला शांत आणि समृद्ध ठेवणार, याबद्दल येथील युवकांच्या मनातील ठाम विश्वास दिसून येतो. सर्वसामान्यांवर कोणतेही निर्बंध असल्याचे येथील जनतेला वाटत नाही. हवा तो व्यवसाय, नोकरी लोक करू शकतात. देशाच्या सीमा खुल्या आहेत. लोक हवे तेव्हा हवे तिथे जाऊ शकतात. केवळ शहरी रशियाचा नव्हे, तर विविधतेने नटलेल्या रशियाच्या मॉस्कोपासून दूर असलेल्या पूर्व, दक्षिण भागांतही पुतीन यांची लोकप्रियता तेवढीच दिसून आली. सलग १२-१५ वर्षे लोकप्रियता वाढण्याचे यापेक्षा मोठे कारण काय असू शकते? असे असले तरी काही लोक पुतीन यांना‘अपरिहार्यता’ म्हणूनही मतदान करताना आढळून आले. बदल झाला तर त्यातून देश मागे जाईल, देशाचे नुकसान होईल म्हणून बदल नको, असा मतप्रवाह असणारे लोकही रशियात पाहायला मिळाले. काहीही कारण असो, पुतीन रशियाचे राज्य चालवताहेत आणि चालवत राहणार, हे पदोपदी जाणवत राहते. अन्य कोणतेही उगवते नेतृत्व दूरपर्यंत दिसत नसताना आजचा पुन्हा उभारी घेतलेला रशिया दिसतो आहे, तो केवळ पुतीन आणि त्यांचे तरुण सहकारी यांच्यामुळेच!

भारताच्या दृष्टीने विचार करायचा तर रशिया हा भारताचा सगळ्यात जुना राजकीय मित्र. पाकिस्तानची युद्धे असोत, अमेरिकेचे निर्बंध असोत, व्यापार, शस्त्रास्त्र करार, आण्विक करार, वैज्ञानिक देवाणघेवाण, शैक्षणिक मैत्री... प्रत्येक क्षेत्रात कम्युनिस्ट काळापासूनच रशियाने मैत्री सांभाळली आणि जोपासली. महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांचे पुतळे अभिमानाने उभारणाऱ्या सोव्हिएत महासंघाचे विभाजन झाल्यावर या संबंधांवर परिणाम होतील, असे जगाला वाटले होते, परंतु तसे काही न होता पुतीन यांनी यात एक पाऊल पुढे टाकत भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. ‘चांद्रयान’, ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे, ‘सुखोई’ विमाने, पाणबुडी संशोधन यासारख्या कित्येक महत्त्वाच्या संशोधनांमध्ये भारताशी पुतीन यांनी सहकार्य करार केले. भारत-रशिया मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून भारत, रशिया, बेलारूस, कझाकिस्तान, आर्मेनिया आणि किर्गिझस्थान या देशांसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करू शकेल. रशियासाठी चीन ही महत्त्वाचा आणि भारतही. पुतीन यांनी दोघांशीही योग्य मेळ घालत संबंध जोपासलेले दिसून येतात. दोन्ही देशांना त्यांचे योग्य स्थान देत, दोन्ही देशांना वेळोवेळी भेटी देत दोन्ही देशांशी संबंध दृढ आणि बळकट केले आहेत.

रशियात फिरताना जाणवलेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रशियन माणसाला भारत आणि भारतीयांविषयी असलेली अतोनात आस्था. पाहायला गेलं तर जपान, रशियासारखे देश झापडबंद बंदिस्त समाज समजले जातात. पण, मला तरी या देशांत राज कपूर यांच्या ‘आवारा’ चित्रपटातील गाणी रशियन माणूस सर्रास गाताना दिसतो. मिथुन चक्रवर्तीच्या नृत्यांवर थिरकताना दिसतो. भारतातील वाहिन्यांचे कार्यक्रम येथे रशियन भाषेत डब करून दाखवले जातात. मी भारतीय आहे हे समजल्यावर येथील विमानतळांवर हिंदी भाषेतील मालिका आवर्जून लावल्या गेल्या. भारतीय माणूस दिसला की, रशियन लोक अत्यंत आस्थेने त्याची विचारपूस करतात. आपण परदेशी सहल आयोजित करताना अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंडसारख्या जागी जाण्याचे ठरवतो,पण या सगळ्या देशांबरोबरच रशियाचा आपल्या यादीत समावेश करा. हॉलीवूडपटात दिसणारे माफिया, क्रूर, कम्युनिस्ट, उर्मट रशियन माणसाचे खरे प्रेमळ, आस्थेवाईक, मृदू रूप पाहण्यासाठी स्वतः अनुभव घ्यायला हवा. निसर्गसौंदर्य, वैभवशाली इतिहास, त्याच्या अभिमानाने जतन केलेल्या खुणा, मॉस्को येथील रेड स्क्वेअरमधील राष्ट्रीय संग्रहालय, तेथील गम डिपार्टमेंटल सेंटरमधील आईस्क्रीम खात क्रेमलिन चौकात फिरणे, सेंट पीटर्सबर्गमधील हर्मिताज म्युझियम, रशियन नजाकतदार बॅले, मातृओष्का बाहुल्या, राष्ट्राभिमानी आणि आस्थेवाईक लोक या सगळ्यासाठी रशिया तुमच्या प्रवासाच्या यादीत असायलाच हवा!

You may also like

Facebook

Shares