Poonam Mahajan

Member of Parliament,North-Central Mumbai

National President-BJYM

poonam Mahajan

Poonam Mahajan

Member of Parliament,North-Central Mumbai

National President-BJYM

‘चकली गोड नसते’.. पूनम महाजन यांनी जागवल्या अटलजींच्या आठवणी

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा आपल्यावरील पितृछत्र हरपल्याचे म्हटले आहे. वाजपेयी हे पूनम यांना पितृतुल्य होते. पूनम महाजनांनी वाजपेयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अटलजींबद्दल सांगताना त्यांनी आपले वडील प्रमोद महाजन यांच्या व वाजपेयींच्या आठवणीही महाएमटीबीला सांगितल्या.

बापजी गेले...घरचे आम्ही त्यांना सर्व बापजी म्हणायचो. आज पुन्हा एकदा माझ्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले. सांगता येणार नाही असा दु:खाचा दुसरा आघात आज माझ्यावर झाला. मन एका क्षणात भूतकाळात घेऊन गेलं. भाजपाची स्थापना आणि माझा जन्म एकाच वर्षातला, १९८० मधला. समजायला लागण्यापूर्वीपासूनच बाबा दिल्लीत पक्षाचं काम करत होते. माझ्यासाठी "कमल का फूल" म्हणजे अटलजी आणि अडवाणीजी. आम्ही त्यांना बापजी आणि दादा म्हणायचो. भाजप हे आमच्यासाठी एक कुटुंबच होतं. बापजी आणि दादा ही या कुटुंबासाठी पितृतूल्य व्यक्तिमत्वे. बापजी आमच्या कुटुंबामागे कायम भक्कमपणे उभे राहिले. बाबा गेल्यानंतर महाजन कुटुंबाने अनेक दुःखे पाहिली. दुर्दैवाने या काळात मात्र बापजींचा आश्वस्त करणारा करोडो भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा धीरगंभीर आवाज शांत होता, केवळ त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे. पण त्यांचा आधार कायम जाणवत होता. आज तो आधार कायमचा तुटला आहे.

अगदी लहानपणीच्या बापजींच्या आठवणी तशा धूसर आहेत. ठळक आठवणी ९० च्या दशकांमधल्या. मी साधारण १४-१५ वर्षांची असेन. अटलजींच्या नावाची भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली होती. भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होते आणि या अधिवेशनाला बाबा मला घेऊन गेले होते. बाबांनी या अधिवेशनात "रेसकोर्स वरून निघालेला अटलजींच्या अश्वमेधाचा अश्व आता ७ रेसकोर्स रोडवरच थांबेल" अशी आत्मविश्वासपूर्ण घोषणा केली आणि सभास्थानी टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. यामुळे बापजींबद्दलचे कुतूहल अजून वाढले. १९९६ साली भाजपाचे सरकार आले. १३ दिवस अटलजी पंतप्रधान होते. बहुमत नसल्याकारणाने राजीनामा द्यावा लागला. त्यावेळचे बाबांच्या डोळ्यात तरळले अश्रू आजही आठवतात. त्यानंतरच्या काळात बाबांनी अटलजींच्या सरकारस्थापनेसाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी बापजींबरोबर झालेल्या चर्चा, झालेले वाद सारे काही डोळ्यांसमोरून जाते आहे. भाजप हे एक व्यासपीठ होते. सगळ्यांचेच सगळ्यांशी बोलणे होत असे, चर्चा होत असत. बाबांना अटलजींसोबत साध्या सोप्या घरोप्याच्या गप्पा करतानाही पाहिलं आहे आणि क्लिष्ट विषयांवर विचारविनिमय करतानाही. कधी कधी बाबा पोटतिडिकेने काही सांगत आणि बापजी सगळं ऐकून 'प्रमोदSSS' एवढंच म्हणत. बाबा काय म्हणताहेत हे त्यांना समजलंय असा त्याचा अर्थ असे. वेगळाच ऋणानुबंध होता दोघांचा. १९९९ साली एनडीएचे स्थिर सरकार आले. एका परिवाराप्रमाणे आमचे बापजींच्या घरी येणे जाणे होते. पंतप्रधान बंगल्यात जाणं आमच्यासाठी आजोळी जाण्यासारखंच होतं. गुन्नो दीदी (अटलजींच्या मानसकन्या) बाबांची राखी बहीण होती. एकदा दिवाळीच्या दिवशी बाबानी मला फराळाचा डबा घेऊन बापजींकडे पाठवले. मी गेले आणि बापजींच्या हातात डबा दिला. त्यांनी विचारलं काय आहे? मी सांगून टाकलं, दिवाळीचं गोड आहे. बापजीनी डब्यात हात घातला. हातात चकली होती. माझ्याकडे बघितलं आणि हसत शुद्ध मराठीत म्हणाले "चकली गोड नसते." भाषांवर असलेलं त्यांचं प्रभुत्व बघून मला धक्काच बसला. अटलजी ७ रेसकोर्स रोडवरील पंतप्रधान निवासात राहायला गेले. ते राहत असलेला ७, सफदरजंग मार्ग हा बंगला त्यांनी आग्रहाने बाबांना घ्यायला लावला. तो बंगला आणि त्यातील बापजींचे सामान म्हणजे आठवणींची ठेवा होता. अटलजी महान शिवभक्त. ते दररोज पूजा करत असत ते शिवलिंग बंगल्यात होते. बाबांनी या शिवलिंगाचे मंदिर तेथे उभारले. बाबा बंगल्यातले सामान बदलायला तयारच होत नव्हते. बापजींचे एक गोल लाकडी टेबल होते. ते टेबल जुने असल्याने बदलावे असे आई बाबांना म्हणत होती. बाबांनी ते टेबल बदलण्यास स्पष्ट नकार दिला. या टेबलजवळ बसून अनेक राजकीय निर्णय घेतले गेले होते. पोखरण चाचणीचा देशाला अभिमान वाटेल असा महत्वपूर्ण निर्णय या टेबलशेजारी बसून घेतला होता. आम्ही राहायला लागल्यानंतरही बापजींचे कुटुंबीय तेथे सतत येत असत. बापजींच्या मानसकन्येची मुलगी नेहा हिचे लाडके मांजर निधनानंतर याच घराच्या अंगणात पुरलेले होते. त्याला फुले वाहायला नेहा कायम येत असे.

अटलजींची माझी शेवटची भेट त्यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात झाली १४ जानेवारी २००६ मध्ये. बाबांनी या कार्यक्रमाचे यजमानपद घेतले होते. त्यावेळी काय करू आणि काय नको अशी बाबांची अवस्था होती. अटलजींना आवडणारा प्रत्येक पदार्थ बाबांनी स्वत: लक्ष घालून बनवून घेतला होता. भारतभरातून सर्वपक्षीय नेते या विजिगिषु नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित होते. पंडित जसराज अटलजींचे आवडते गायक. त्यांच्या स्वरांच्या मैफिलींमध्ये बापजी रंगून गेले होते. यावेळी मी माझा दोन वर्षांचा मुलगा आद्यला ही बरोबर घेतले होते. बापजींना त्याला आशीर्वाद द्यायची विनंती केली. बापजी त्याला कडेवर घेऊन त्याच्याशी खेळण्यात रमून गेले. याहून जास्त काय हवं? अटलजी अडवाणीजींबरोबरचे असे कित्येक अविस्मरणीय क्षण आहेत. बाबांचे वडील त्यांच्या लहानपणीच गेले पण अटलजी आणि अडवाणीजींनी बाबांवर मुलासारखे प्रेम केले. बाबांना त्यांच्या वडिलांची उणीव कधी भासलीच नसेल. कोणत्याही प्रसंगात ते आई आणि बाबांच्या मागे भक्कमपणे उभे होते. माझ्यासाठी त्या काळी बापजी आणि दादा म्हणजेच भाजपा, संघपरिवार होते. रजत जयंती अधिवेशनात राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर करताना अटलजींनी बाबांची भाजपाच्या पुढच्या नेतृत्वातील लक्ष्मण म्हणून घोषणा केली. शिवाजी पार्कवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. एका निष्काम कर्मयोद्ध्याने कायमचा शस्त्रसन्यास घेतला होता. त्यानंतर वर्षभरातच बाबांचे निधन झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते "ढग नसताना विजांचा कडकडाट झालाय." लक्ष्मण गेला आणि भाजपाच्या बापजीरुपी धीरगंभीर हिमालयाचा आवाज कायमचा शांत झाला. १२ वर्षे झाली बाबांना जाऊन. प्रत्यक्षात उपस्थित राहू शकत नसले तरी बापजी आमच्यासाठी आजही आधार होते. १२ वर्षे महाजन कुटुंबियांना आपल्या पंखांच्या छत्रछायेत सांभाळून घेणारा गरुड आज कायमचा शांत झाला. आज मी खऱ्या अर्थाने पोरकी झाले. १९५२ साली जनसंघाच्या स्थापनेपासून २००५ मध्ये राजसंन्यास घेईपर्यंत अनेक वादळे अंगावर घेत, अनेक घाव सोसत भाजप परिवाराची सावली बनलेले हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी नामक उत्तुंग व्यक्तिमत्व शांत झाले. या शिखराची शीतल छाया मात्र भाजपावर कायमच राहील.

You may also like

Facebook

Shares